सोन्याचे भाव सध्या उच्चांकी पातळीवर पोहोचले असले तरी, येत्या काळात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. काही दिवसांपूर्वीच सोन्याने एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, सध्या २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव सुमारे एक लाख रुपयांच्या जवळपास आहे. आता मात्र, या दरात तब्बल १२,००० रुपयांची घसरण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सोन्याच्या दराबाबत तज्ज्ञांचे मत
केडिया ॲडव्हायझरीचे संचालक अजय सुरेश केनिया यांच्या मते, सोन्याच्या दरात सध्या जरी वाढ दिसत असली तरी नजीकच्या काळात त्यात मोठी घट होईल. या घसरणीनंतर २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ८० ते ८२ हजार रुपयांपर्यंत स्थिर होऊ शकतो.
या घसरणीमागे अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कारणे आहेत.
सोन्याचे भाव का कमी होणार?
- नफा कमावण्यासाठी विक्री: जेव्हा सोन्याच्या किमती खूप वाढतात, तेव्हा सराफा बाजारात आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETFs) मध्ये गुंतवणूकदारांकडून नफा कमावण्यासाठी मोठ्या प्रमाणात विक्री सुरू होते. यामुळे सोन्याच्या दरावर दबाव येतो आणि किमती कमी होतात.
- आंतरराष्ट्रीय घडामोडी: अमेरिका आणि इतर देशांचे व्यापार धोरण सौम्य झाल्यामुळे तसेच भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी झाल्यामुळे जागतिक स्तरावर अनिश्चितता कमी झाली आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होतो आणि त्या घसरतात.
- आरबीआयचे धोरण: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) मौद्रिक धोरण सोन्याच्या किमती ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. येत्या ऑगस्ट, २०२५ रोजी होणाऱ्या बैठकीत आरबीआय रेपो दरात ५० बेसिस पॉइंट्सची कपात करण्याची शक्यता आहे. रेपो दरातील कपातीमुळे गुंतवणूकदारांचा सोन्यातील गुंतवणुकीकडे ओढा कमी होऊ शकतो, ज्यामुळे सोन्याचे दर खाली येऊ शकतात.
या सर्व कारणांमुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण अपेक्षित असून, सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.