Soyabean Rate: लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून बाजारात सोयाबीनची आवक कमी झाल्यामुळे दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज, ८ ऑगस्ट रोजी सोयाबीनचे दर क्विंटलमागे ₹४,८९० पर्यंत पोहोचले आहे. हे दर शासनाच्या ₹४,९९२ च्या हमीभावाच्या अगदी जवळ पोहोचले असून, शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बाब आहे.
हंगामातील सर्वाधिक दर
यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच सोयाबीनला इतका चांगला भाव मिळाला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात दरात वाढ झाली होती, त्यानंतर तीन महिन्यांनी पुन्हा दरांनी उसळी घेतली आहे. लातूरमधील खासगी कंपन्यांमध्येही सोयाबीनचा भाव ₹४,९०० प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने मागील हंगामातील सोयाबीन अजूनही घरात साठवून ठेवले होते, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.
भाववाढीमागे कारण काय?
बाजारपेठेत सोयाबीनच्या आवकेत झालेली घट हे या भाववाढीचे मुख्य कारण आहे. २८ जुलै रोजी आवक १७५५ क्विंटलपर्यंत खाली आल्यानंतर दरांना पुन्हा एकदा गती मिळाली. त्याआधीही आवक कमी असल्यामुळे दर ₹४,४४८ वरून ₹४,५७५ पर्यंत वाढले होते. त्यानंतर दरांमध्ये चढ-उतार सुरूच राहिली.
गेल्या वर्षीच्या हंगामात काढणीनंतर पहिल्यांदाच दरात अशी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखी आशा निर्माण झाल्या आहेत. मात्र, भाव आणखी वाढतील की नाही याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात द्विधा मनस्थिती आहे. त्यामुळे, सध्याच्या चांगल्या दराचा लाभ घ्यावा की आणखी वाट पाहावी, या विचारात शेतकरी आहेत.