Cyclone Alert: राज्याच्या किनारपट्टीवर पुन्हा एकदा एका नवीन संकटाची चाहूल लागली आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक भागांमध्ये गोंधळाचे वातावरण असतानाच, आता हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा (Cyclone Alert) जारी केला आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे, ज्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, चक्रीवादळसदृश ही प्रणाली उत्तरेकडे सरकताना अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागांसह कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. या काळात ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील आणि समुद्रही खवळलेला राहील. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः मच्छिमारांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चक्रीवादळाचा मान्सूनवर काय परिणाम होईल?
अरबी समुद्रात एका बाजूला मान्सूनचे वारे वेगाने पुढे सरकत आहेत, तर दुसऱ्या बाजूला चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. यामुळे मान्सूनच्या वाटचालीवर काही परिणाम होईल का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या तरी मान्सूनच्या प्रवासावर या स्थितीचा कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. मान्सूनची गती कायम असून, तो त्याच्या ठरलेल्या मार्गाने पुढे सरकत आहे.
सद्यस्थितीत मान्सूनने श्रीलंकेचा मोठा भाग व्यापला आहे आणि तो केरळच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातही मान्सूनने प्रगती केली आहे. त्यामुळे चक्रीवादळाच्या इशाऱ्यासोबतच मान्सूनच्या आगमनासाठीही पूरक स्थिती निर्माण झाली आहे.